लय इज्जत लय मान

“तुझ्या दोन्ही पोरी नक्षत्रासारख्या हायेत,” बाप्पू हनमाला म्हणाला. “त्यांच्या लग्नाची काळजी करू नको. त्या चांगल्या मोठ्यांच्या घरात जाऊन पडतील.”

“मोठ्या घरात पोरी द्यायला माझी पण ऐपत पाह्यजे ना! मोठं लग्न करायचं मला जमणारहे का?” बापूने मित्राला विचारलं.

“आता पहिल्यासारखं राह्यलं नाय,” बाप्पू बोलू लागला. “आजकालची पोरं पोरगी पसंत पडली की बाकी काय बघत नाय. त्यांना फक्त देखणी पोर पाह्यजे!”

“तसं झालं तर देवच पावला म्हणायचा!” हनमा आभाळाकडे बघत म्हणाला.

थोरली अंकिता टिवायला गेली आणि हनमाने तिच्या लग्नाची तयारी सुरू केली. एकामागोमाग एक चांगली स्थळं येत होती, पसंतीही होई; पण ‘बोलण्यात’ कार्य फिस्कटे.

“आम्हाला तुमचा रुपया नको. लग्न मात्र आमच्यासारखं करून द्या,” समोरची पार्टी अट घाली.

हनमाला दोन लग्नाच्या पोरी आणि तिसरा मुलगा. अवघी एकरभर जमीन. हुंडा तर नाहीच पण चांगलं लग्न करून द्यायचीही त्याची ताकद नव्हती. मुलींच्या लग्नांसाठी जमीन विकल्यावर हनमा तर उघडा पडणारच; पण त्याचा पोरगाही बापाच्या नावाने खडे फोडणार.

थोडक्यात, पोरींची लग्न ‘जशी होतील तशी’ करण्याशिवाय हनमाकडे पर्याय नव्हता.

अंकिताने टिवायचे पेपर दिले. ती सुंदर असल्याने तिला मोठी स्थळं येत होती; पण हनमात मोठा खर्च करण्याची ताकद कुठं? शेवटी त्याने जेमतेम परिस्थिती असलेल्या कुटुंबात अंकिताला देऊन टाकली. माणसं साधी होती. मुलगा चांगला होता. विशेष म्हणजे दोन्ही कुटुंबं बरोबरीची होती. कुणी उजवा, कुणी डावा म्हणायला जागा नव्हती.

“लिहून घे, तुझी अंजू मोठ्या घरातच जाणार!” आता बाप्पू हनमाच्या दुसऱ्या मुलीबद्दल बोलू लागला.

“अंकिताच्या वेळेला पण तू आसंच म्हणला होता.” उदास होत हनमा म्हणाला.

“अंकिताच्या नशिबात नव्हतं, पण अंजू नशीब काढणार.”

“अंजू आत्ताशी एफवायलाहे.”

“त्याला काय होतंय? चांगलं स्थळ आलं की उडवायचा बार!” उजवा हात वर करत बाप्पू म्हणाला.

“पोरींच्या लग्नांचं टेन्शन तुला कळायचं नाय,” हनमा म्हणाला. तो गंभीर झालेला पाहून बाप्पू गप्प झाला.

पण अंजुच्या वेळी बाप्पूची भविष्यवाणी खरी ठरली.

सासवडच्या एका मोठ्या घरातल्या, जिल्हा परिषदेचं सभापतीपद भूषवलेल्या सर्जेराव जाधवांच्या मुलाचं स्थळ अंजुसाठी आलं. त्यांनी अंजुला फक्त पसंतच केली नाही तर लग्नाच्या सगळ्या खर्चाची तयारीही दाखवली.

“हे लग्न जाधवांच्या घराण्याला शोभेलसं होईल,” मध्यस्थ सांगत होता. “तुम्हाला जेवढी रक्कम देणं शक्य आहे तेवढीच तुम्ही द्या. बाकीचा खर्च जाधव करतील.”

हनमा विचारात पडला. एवढी मोठी सोयरीक आपल्याला झेपेल का?

सर्जेराव जाधवांनी पन्नाशी पार केली होती. सोहम त्यांचा एकुलता मुलगा. सोहमच्या अगोदर त्यांना दोन मुली होत्या. दोघींची लग्न झालेली. सर्जेरावांच्या पुढे हनमा अगदीच तरुण आणि अपरिपक्व वाटायचा. सर्जेराव राजकारणाच्या, व्यवसायाच्या, समाजाच्या मोठमोठ्या गप्पा मारू लागले की हनमाला काय बोलावं कळत नसे.

त्यात जाधवांचा भव्य बंगला बघून हनमाचे डोळे दिपून गेले होते. जाधवांचा आणि आपला कुठंच मेळ बसत नाही. कुठं आपली खळखळ वाजणारी बॉक्सर आणि कुठं जाधवांची रुबाबात चालणारी फॉर्च्युनर?

सोहमने अंजुला मागणी घालणं एखाद्या राजपुत्राने खेड्यातल्या नदीवर पाणी न्यायला आलेल्या गरीब पण सुंदर मुलीला मागणी घालण्यासारखं होतं. अशा गोष्टी परीकथेतच घडतात हे हनमाला समजत होतं.

“जाधवांना अंजू पसंद पडलीय, ते लग्नाचा सारा खर्च करायला तयारहेत, मग तुझी काय अडचणहे?” बाप्पूने विचारलं.

“ह्या लग्नाला मी जास्तीत जास्त लाखभर रुपये जमवू शकतो,” हनमा म्हणाला.

“मध्यस्थ काय म्हणलाय?” बाप्पू बोलू लागला, “तुमच्याकडे जे असेल ते देऊन टाका. बाकीचं जाधव बघत्यान.”

“तू म्हणतोय तर तसंच करू.” मग हनमानेही जास्त विचार केला नाही. त्याच्या जवळची रक्कम मध्यस्थामार्फत जाधवांकडे पोचवली. सासवडकरांनी लग्नाचा कार्यक्रम थाटात पार पाडला. तालुक्यातील सर्व पुढारी मंडळी लग्नाला उपस्थित होती.

स्वतःच्या मुलीचं लग्न असूनही हनमा लग्नात बावरून गेला होता. तो पाहुण्यासारखा वावरत होता. कार्यालयाचं भाडंच दोन लाख रूपये होतं. जाधवांनी अंजुला घातलेले दागिने पाहून त्याचा जीव इवलासा झाला होता.

“पोरीनं नशीब काढलं!” लग्नाचा कार्यक्रम पार पडल्यावर हनमा बाप्पूला म्हणाला.

“काय म्हणलो होतो मी?” बापू स्वतःवर खुश होता.

“भारीच माणसं भेटली बघ! एवढा पैसाहे; पण अजिबात अहंकार नाय. व्याही कुठं भेटले तर लय इज्जत, लय मान देत्यात.”

हनमा हे फक्त बाप्पूलाच नाही तर गावात प्रत्येकाला सांगे. त्याला सर्जेराव जाधवांसारखा व्याही मिळाला म्हणून गावातले बरेचसे लोक त्याच्यावर जळतही होते. व्याह्याचं कौतुक करताना हनमाचं तोंड दुखत नव्हतं.

“आमचं याही लय भारी! ते मला लय इज्जत, लय मान देत्यात!” गावात कुणीही भेटलं की हनमाचं हेच पालुपद चाले. मग गावातली काही खवचट मंडळी हनमाला बघून एकमेकांच्या कानांत “लय इज्जत, लय मान’ म्हणू लागली.

अंजुचं लग्न झाल्यापासून हनमा एकदाच तिच्या घरी गेलेला. सत्यनारायण आणि जागरण गोंधळासाठी. लग्नानंतर दोन्ही तिन्ही वेळा हनमाच्या मोठ्या भावाने अंजुला तिच्या सासरी सोडलेलं. हनमाचा ‘कार्यकर्ता-छाप मोठा भाऊ’ पैसा पाळून होता. जाधवांशी सोयरीक झाल्यानंतर अंजुला नेण्या-आणण्याचं काम तो हौसेने करी. आपल्याच पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सर्जेरावही त्याच्या पाठीवर हात फिरवत.

हनमा व्याह्यापासून चार हात दूर राहत असे. त्याच्या मनात सर्जेरावांविषयी आदरयुक्त भीती होती. एकदा हडपसरला एका लग्नात गाठ पडली असता सर्जेरावांनी स्वतःहून पुढे येऊन बरोबरच्या मंडळींची हनमाशी ‘आमच्या सोहमचे सासरे’ अशी ओळख करून दिलेली. व्याही चारचौघांत आपल्याला एवढी किंमत देतात याचं हनमाला अप्रूप वाटलं.

अंजु एवढ्या समृद्धीत लोळतेय यावर हनमाचा विश्वास बसत नसे. हनमाचा जावई सोहम एक आनंदी वृत्तीचा तरूण होता. तसंच तो समंजसही होता. अंजूच्या साध्या घराची, तिच्या गरिबीची त्याला कधी लाज वाटली नाही. अंजूची सासू जिजाबाई एक दोन वेळा व्याह्यांकडे आलेली. अंजूचे आई-वडील गरीब असले तरी त्यांनी अंजुवर चांगले संस्कार केले होते हे जिजाबाई पाहत होती. तिला सुनेचं कौतुक वाटे. सर्जेरावांनी मात्र व्याह्याच्या घरात लग्नानंतर एकदाही पाऊल ठेवला नव्हता.

अंजू माहेरी आली की सासरचं कौतुक करून सगळ्यांना बेजार करायची. अंजूकडून तिचं ‘सासरमाहात्म्य’ ऐकताना इतर लोक कंटाळत असले तरी तिच्या आई-वडिलांना आनंदच होई.

अंजुच्या दिवाणखान्यातला एअरकंडिशनर असो वा स्मार्ट टीव्ही, किचनमधला ओव्हन असो वा डबलडोअरचा फ्रीज अंजुला सर्व वस्तू अपरिचित होत्या. तिने त्या कधी हाताळल्या नव्हत्या. पण जिजाबाईने अंजुला सांभाळून घेतलं, नव्या जीवनशैलीशी तिचा परिचय करून दिला.

अंजूच्या चेहर्‍यावरचा आनंद बघून तिने पूर्वजन्मात काहीतरी पुण्य केलं असेल म्हणूनच तिला एवढं चांगलं सासर मिळालं असं हनमाला वाटे.

“उद्या सोमवतीहे. जेजुरीला जायचं का?” बाप्पूने विचारलं.

“चालतंय की. जाताना अंजूच्या घरी जाऊ.” हनमाने होकार दिला आणि बाप्पू खूश झाला. त्याला जाधवांचा बंगला पाहायचा होता.

हनमाने बॉक्सरला किक मारली. बाप्पू मागे बसला होता. बाॅक्सरची चेन ढिली असल्याने ती खळखळ करत होती. वडकी नाल्याजवळ गाडी पंक्चरही झाली. पंक्चर काढून दोघे पुढे मार्गाला लागले.

अंजूच्या घरी पोचायला त्यांना अकरा वाजले. बंगल्याचं गेट ओढून घेतलं होतं. आवाज देऊनही कुणी बाहेर न आल्याने हनमाने गेट उघडून गाडी आत घेतली. आपली गरीब बाॅक्सर व्याह्यांच्या इनोव्हाशेजारी उभी करताना त्याने समोर पाहिलं तर इस्त्रीचे पांढरेशुभ्र, कडक कपडे घालून सर्जेराव पोर्चमध्ये येरझारा घालत होते. आवाज देऊनही व्याह्यांनी गेट उघडू नये याचं हनमाला विशेष वाटलं.

“आजच ह्या ड्रायव्हरला काम निघालं!” मोबाईल कट करून सर्जेराव ओरडले. ड्रायव्हर उशीरा येणार म्हणून ते चिडले होते.

हनमाने सर्जेरावांना “रामराम” केला पण त्यांनी न पाहिल्यासारखं करून हनमाकडे पाठ फिरवली. हनमा आज पहिल्यांदा सर्जेरावांना एकटं पाहत होता. आज त्याला व्याह्यांचं खरं रूप दिसणार होतं.

“हे अंजुचे सासरे…”

दारात आलेल्या या दोघांना “या” म्हणण्याचंही औचित्य न दाखवता घरात निघालेल्या पाठमोऱ्या सर्जेरावांकडे बघत हनमा बाप्पूला म्हणाला. व्याह्याने असा अव्हेर केला असला तरी मुलीचा बाप म्हणून कमीपणा घेऊन हनमा सर्जेरावांमागे बंगल्यात गेला. बाप्पू त्याच्यामागे होताच.

हॉलमध्ये तीन बाजूला तीन लांबलचक सोफे होते. चौथ्या बाजूच्या भिंतीवरची टीव्ही सुरू करून सर्जेरावांनी उजव्या सोफ्यावर अंग टाकलं. डोक्याखालची उशी व्यवस्थित करून हिंदी बातम्यांचा चॅनेल सुरू केला.

सर्जेराव “बसा” म्हणाले नसतानाही हनमा अंग चोरून समोरच्या सोफ्यावर बसला आणि बाप्पूलाही खुणेने बसायला लावलं.

अजूनही सर्जेरावांनी सूनेच्या वडिलांना “कधी आलात? कसे आहात?” म्हणायची तसदी घेतली नव्हती.

“नंद्याऽ कुठं जाऊन मेलाय? दोन ग्लास पाणी आण,” सोफ्यावर पडल्या पडल्या सर्जेरावांनी ऑर्डर सोडली. काही वेळ गेला पण बाहेरून, आतून कुठूनही उत्तर आला नाही.

“हा गडी कुठं आई घालायला गेला काय माहीत!” सर्जेराव पुन्हा ओरडले.

“मी आणतो पाणी…” दबक्या आवाजात बोलत हनमा चोरपावलांनी किचनमध्ये गेला.

घरात कुणीच कसं नाही? अंजू कुठंय? पाणी आणण्यापेक्षा आपली मुलगी कुठं आहे हे पाहायला हनमा किचनमध्ये गेला होता. तिथं कुणीच नव्हतं. किचनजवळची सर्जेरावांची बेडरूम बंद होती. हनमाने पाण्याचे तीन ग्लास भरले आणि ग्लास ट्रेमध्ये मांडून हॉलमध्ये आला.

“पाणी घ्या…” चेहऱ्यावरचा दीनवाणीपणा लपवत हनमाने सर्जेरावांपुढे पाण्याचा ग्लास धरला. त्याच्याकडे न पाहता सर्जेराव रिमोटशी चाळा करत राहिले. बाप्पूने पटकन उठून ट्रेमधला एक ग्लास घेतला. संकोचलेल्या हनमाने ट्रे टिपाॅयवर ठेवला.

“अंजू न् जावायबापू दिसत नाय.” दहाएक मिनिटांनी व्याह्यांचा मूड ठीक झाला असेल असं समजून हनमाने विचारलं.

“मला काय माहीत? ते काय मला सांगून जातात काय?” सर्जेराव हनमावर खेकसले.

“आम्ही निघतो.” मित्रासमोर अधिक तमाशा नको म्हणून हनमा उठून उभा राहिला. बाप्पूनेही लगेच जागा सोडली.

दोघे बंगल्याच्या पोर्चमध्ये उभं राहून चपला घालत होते तेवढ्यात अंजूची सासू समोरून आली.

“अग्गोऽ बाई! तुम्ही कधी आलात?” हे विचारताना जिजाबाईच्या चेहर्‍यावर प्रसन्न हसू होतं.

बायकोचा आवाज ऐकताच सर्जेराव बाहेर आले व म्हणाले, “मी त्यांना ‘चहा पिऊन जा’ म्हणून किती आग्रह केला पण ते ऐकायलाच तयार नाहीत. पाणी पिऊन तसंच निघाले.”

हनमा, बाप्पू ऐकत राहिले.

“आता मी आलेय ना! चहा घेतल्याशिवाय पाहुणे कसे जातात बघतेच ना.” जिजाबाई अधिकारवाणीने बोलली.

“अहो, खरंच चहा नको. आम्हाला दुपारच्या आत जेजुरीला जायचंय,” हनमा गडबडला.

“चहाला किती वेळ लागतो?” जिजाबाई म्हणाली, “अंजू असती तर असं बिनचहाचं गेला असता का?” तिने पाहुण्यांना निरुत्तर केलं होतं. सोहम, अंजू पहाटेच महाबळेश्वरला गेल्याचं जिजाबाईकडूनच समजलं.

दरम्यान सर्जेरावांनी पुन्हा सोफ्यावर अंग टाकलं. यावेळी त्यांनी मराठी बातम्यांचा चॅनेल लावला. थोड्याच वेळात जिजाबाईने तीन कप चहा आणला. “सकाळीच चहा झालाय” म्हणत सर्जेरावांनी गरीब व्याह्यांसोबत चहा घेण्यास नकार दिला.

सकाळी इस्त्रीच्या कडक कपड्यांची काळजी घेणारे सर्जेराव आता परीटघडीची पर्वा न करता सोफ्यावर लोळत होते. सर्जेरावांचं आजचं वागणं हनमाला समजत नव्हतं. बाहेर चारचौघांत भेटल्यावर सर्जेराव किती वेगळे वाटतात?

खरं पाहता सर्जेरावांनी गरीब व समाजात पत नसलेल्या हनमाच्या कुटुंबाशी कधीच सोयरीक केली नसती. त्यांनी एकुलत्या मुलांसाठी वीसहून अधिक मुली पाहिल्या होत्या; पण सोहमला परी हवी होती आणि तशी परी न मिळाल्याने त्याने वडीलांनी दाखवलेल्या सगळ्या मुली नाकारल्या होत्या.

दिखाऊपणाच्या सोशल मिडीयाच्या काळात सोहमला ‘जिच्याबरोबर आपले फोटो, व्हिडिओ पाहून लोकांना हेवा वाटेल’ अशीच मुलगी हवी होती. ज्या मुलीशी लग्न करायचं तिचं शिक्षण, वर्तन, राहणीमान तसंच तिच्या कुटुंबातील संस्कार, सभ्यता ह्या गोष्टींशी त्याला घेणं-देणं नव्हतं.

सुंदर मुलगी हवी एवढाच सोहमचा अट्टाहास असता तर त्याला साजेशी मुलगी मिळालीही असती; पण त्याने मुलीची उंची ५ फूट ९ इंचच हवी अशीही अट घातली होती. त्यामुळेच अंजुपूर्वी त्याच्याकडून कितीतरी मुली नापास झाल्या होत्या.

हडपसरच्या साधना काॅलेजबाहेर सोहमने अंजूला पाहिलं होतं. ‘दिसताक्षणी प्रेम’ झालेल्या सोहमने अंजूची माहीत मिळवून तिला रीतसर मागणी घातली होती. अंजूच्या घरच्यांनी एवढं चांगलं आणि चालून आलेलं स्थळ नाकारण्याची शक्यता नव्हतीच.

सुदैवाने घरची गरीबी आणि मध्यात सोडलेलं शिक्षण वगळता अंजूत काही कमी नव्हती आणि याच गोष्टीचा जिजाबाईला आनंद झाला होता. अंजूसारखी सून मिळवून ती धन्य झाली होती.

सर्जेरावांना हे स्थळ आवडलं नव्हतं पण सोहमच्या हट्टापढे त्यांचं काही चाललंही नव्हतं. लग्नानंतर जिजाबाई सुनेच्या घरी दोन वेळा आली होती. सर्जेरावांनी मात्र व्याह्याच्या घरी येणं काहीतरी कारण काढून प्रत्येक वेळी टाळलं होतं.

चहा पिऊन झाला. आता निघावं की बसावं? विहीणबाईंचा निरोप घेऊन निघावं तर त्या किचनमधून बाहेर येईनात. हनमा अस्वस्थ झाला.

“आम्ही निघू का?” दबक्या आवाजात हनमाने सर्जेरावांना विचारलं.

सर्जेरावांनी न ऐकल्यासारखं केलं. ते चॅनेल बदलत होते. शेवटी त्यांनी ॲनिमल प्लॅनेट लावला. त्यावर कुत्र्यांवर बनवलेली एका डॉक्युमेंटरी फिल्म दाखवली जात होती. अचानक त्यातील कुत्री मोठ्याने भुंकू लागले आणि सर्जेरावांनी टीव्हीचा आवाज वाढवला.

“जेजुरीला जायचंय. निघतो आम्ही.” म्हणताना हनमाचा आवाज क्षीण झाला होता. विहीणबाईंचा निरोप न घेताच तो बाहेर पडला.

“हॅलोऽ अंजू. पोचली का महाबळेश्वरला? सकाळी तुझा फोन लागत नव्हता…” बंगल्याच्या बाहेर पडताच हनमाने मुलीला फोन लावला.

“आम्ही गाडीत आहोत. इथे घाटात रेंज कमी जास्त होतेय. मी नंतर फोन करते.” अंजूचा आवाज कट झाला, पण तेवढ्यातही फॉर्च्यूनरमध्ये वाजणारं “आज दिल है पानी पानी” गाणं हनमाच्या कानावर पडलं. त्यासोबत अंजू, सोहमच्या हसण्या-खिदळण्याचा आवाजही आला.

फोन खिशात ठेवल्यावर हनमाने त्याची खडबडी बॉक्सर चालू केली. एवढं सगळं बघून मागे बसलेला बाप्पू गप्प झाला होता.

“जावाय चांगलाहे. इहीनबाय चांगलीहे. पोरगी खुशीतहे. मला आजून काय पाह्यजे?” हनमा बाप्पूला म्हणाला.

Leave a Comment