मोझे आळीतल्या आमच्या वाड्यात भाऊबंधांबरोबर वरचेवर वाद होऊ लागल्याने वडिलांनी वाडग्यात राहायचा निर्णय घेतला. दूधाचा धंदा बंद करायचा म्हणून त्यांनी सगळ्या म्हशी विकल्या होत्या. मोकळ्या झालेल्या गोठ्याला पुढे एक भिंत बांधून, त्याला पत्र्याचा दरवाजा लावून, वडिलांनी राहण्यायोग्य सपार (झोपडी) बनवलं होतं.
लहानपणचा एक गणेशोत्सव मी कधीच विसरू शकणार नाही.
गणपतीची मूर्ती आणण्यासाठी पैसे नव्हते म्हणून वडिलांनी चिखलापासून एक बऱ्यापैकी गणेशमूर्ती बनवली. त्याच मूर्तीवर त्या वर्षीचा गणेशोत्सव साजरा झाला.
आज सकाळी श्री गणेशाची मूर्ती आणायला निघालो असता बरोबर निघालेल्या माझ्या मुलांनी “कमीत कमी एक फूट उंचीची मूर्ती घ्यायची!” म्हणून मला बजावलं होतं.
त्यावरूनच हे सगळं आठवलं…